रविवार, १५ जून, २०२५

भोई समाज महासंघ समितीची हिमायतनगर तालुका कार्यकारणी जाहीर ; तालुका अध्यक्षपदी विनायक वट्टटवाड तर उपाध्यक्षपदी माधवराव बावणे

 

भोई समाज महासंघ समितीची हिमायतनगर तालुका कार्यकारणी जाहीर 

तालुका अध्यक्षपदी विनायक वट्टटवाड तर उपाध्यक्षपदी माधवराव बावणे 

हिमायतनगर (दाऊ गाडगेवाड ) - राज्यातील भोई समाजाची अतिशय बिकट परिस्थिती झाली असून त्या प्रश्नाकडे कोणीही लक्ष देत नसून भोई समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी हिमायतनगर येथील महात्मा फुले सभागृहामध्ये भोई समाज महासंघ समितीची संस्थापक अध्यक्ष राजुभाऊ मामुलवार यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. १५ जून रोजी कार्यकारणी जाही करण्यात आली असून तालुका अध्यक्षपदी विनायक वट्टटवाड तर उपाध्यक्षपदी माधवराव बावणे यांची निवड झाली आहे.

      तसेच युवक तालुकाध्यक्षपदी माधव वदतवाड, युवक उपाध्यक्षपदी विठ्ठल वटटवाड यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ कार्यकरणीमध्ये सचिव साहेबराव अष्टकर, कोषाध्यक्ष प्रकाश बोरकर, कार्याध्यक्ष रामराव टोकलवाड, सल्लागार ॲड. ज्ञानेश्वर पंदलवाड, संघटक परमेश्वर उट्टलवाड, सुरेश टोकलवाड, संजय पंदीलवाड, शंकर डाके, संजय उट्टलवाड, संभाजी उट्टलवाड शिवाजी भट्टेवाड यांची सदस्यपदी तर संपर्क प्रमुख संतोष टोकलवाड यांची निवड करण्यात आली. 


          युवक कार्यकारणीमध्ये सचिवपदी दाऊ गाडगेवाड, कोषाध्यक्ष व्यंकटेश पामलवाड, कार्याध्यक्ष साहेबराव वटटवाड, संघटक नितिन भट्टेवाड, संपर्क प्रमुख अंकुश उट्टलवाड, सल्लागार सयाजी वटटवाड, सहसल्लागार पंजाब वटटवाड, संतोष वटटवाड, अंकुश शहारे, ऋषिकेश नागलवाड, गणेश भट्टेवाड, विकास भट्टेवाड, आतिष वटटवाड, किरण उट्टलवाड यांची सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. 

     यावेळी संस्थापक अध्यक्ष राजुभाऊ मामुलवार, निषादपार्टी जिल्हाध्यक्ष श्रीराम डुबुकवाड, जिल्हा सल्लागार गोविंदराव कोलंबीकर, जिव्हा उपाध्यक्ष माधव गंधलपवाड, समाजसेवक श्रीराम टोपलवाड, मांडवीचे सरपंच सुर्यभान डुबुकवाड, लोहा तालुकाध्यक्ष पुंजाजी शेवडकर, नवरंगपुरा ग्रां.पं.सदस्य सखाराम उट्टलवाड, डॉ. व्यकटेश निलेवार, बळेगावचे चेरमन गोविंदराव डुबुकवाड, उमरीचे तालुकाध्यक्ष बालाजी गाडेवाड, उमरीचे ता. उपाध्यक्ष गोविंद महाराज शेलगांवकर, समाज सेवक गंगाधर डुबुकवाड, प्रमोद भट्टेवाड उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष विजय उट्टलवाड यांनी केले.निवडीच्या वेळी मोठ्या प्रमाणात भोई समाजातील नागरीक व महिला उपस्थित होत्या.


रासायनिक खते व बियाण्याची ज्यादा दराने विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकावर कारवाई करा

 

रासायनिक खते व बियाण्याची ज्यादा दराने विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकावर कारवाई करा

त्रिरत्नकुमार भवरे यांची लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्या कडे मागणी.

वार्ताहर (पांडुरंग मीराशे ) -खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच हिमायतनगर तालुक्यात डीएपी एरिया रासायनिक खताचा तुटवडा झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले या खताच्या तुटवड्यामुळे पेरणी करिता महागाडी रासायनिक खते शेतकऱ्यांना घ्यावे लागले तर अनेक कृषी सेवा केंद्र चालकाकडून शेतकऱ्यांना मुजोरपणा करून बी बियाण्याची ज्यादा दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्या विरुद्ध जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी यांनी विशेष पथक नेमून योग्य चौकशी करून अशा मुजोर व ज्यादा दराने बी बियाणे , रासायनिक खते विकणाऱ्या दुकानदारावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी  श्रीरत्नकुमार भवरे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे आता जिल्हा विशेष भरारी पथक हिमायतनगर तालुक्यासह ग्रामीण भागातील कृषी सेवा केंद्र चालकावर काय कारवाई करेल याकडे अनेक सुजाण शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

    चालू खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच हिमायतनगर तालुक्यात कृषी सेवा केंद्र चालकाकडून शेतकऱ्यांना वेटीस धरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. युरिया डीएपी रासायनिक खताचा कृतीम तुटवडा करून महागड्या खतांचा पेरणी करिता शेतकऱ्यांना पुरवठा करण्याची रणनीती दुकानदार युनियनने केल्याचा भास जाणवत होता अनेक कृषी सेवा केंद्र चालकाकडून  काही कंपन्यांचे रासायनिक खते बियाणे विक्रीकरिता बंधनकारक असतानाही बुरशीनाशकासह अव्वाच्या स्वभावामध्ये शेतकऱ्यांच्या माती मारल्या गेल्याची खंत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली शेतकऱ्यास मुजुर वृत्ती करून जादा दराने रासायनिक खते बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारावर मात्र भरारी पथकाने मेहेर नजर दाखवल्याचे चित्र पहावयास मिळाले त्यामुळे याबाबतीत उलट सुलट चर्चेला तालुक्यात ऊत आला आहे.

तर काही कृषी सेवा केंद्र चालक तेलंगणा राज्यातील विक्रीसाठी बंधनकारक असलेले बियाणे खते ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विक्री करत असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे परंतु या बाबतीत भरारी पथक मात्र कुठलीही एकाही दुकानदारावर कार्यवाही केली नसल्यांची खंत सुजान शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे.

 आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिवसाढवळ्या बी बियाणे रासायनिक खते यांच्या माध्यमातून लुबाडणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकावर जिल्हाधिकाऱ्यांनी व जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी विशेष भरारी पथक नेमून त्यांची चौकशी करावी व चौकशी अंति गुन्हेगार आढळल्यास त्या दुकानदारावर कायदेशीर कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करावा अशी मागणी बहुजन युवा टायगर फोर्सचे संस्थापक अध्यक्ष  त्रिरत्न कुमार भवरे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली.


पी एम श्री जि.प.के.प्रा.शाळा सरसम येथे उद्या साजरा होणार प्रवेशोत्सव

 

 तहसीलदार पल्लवी टेमकर मॅडम यांची विशेष उपस्थिती

हिमायतनगर (विजय वाठोरे सरसमकर )- हिमायतनगर तालुक्यातील नावाजलेली तालुक्यातील प्रथम आयएसओ मानांकन दर्जा प्राप्त शाळा म्हणजेच पी एम श्री जि.प.के.प्रा.शाळा सरसम येथे उद्या दिनांक १६ जून रोजी प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या प्रवेशोत्सव कार्यक्रमास प्रशासकीय अधिकारी म्हणून हिमायतनगर च्या तहसीलदार पल्लवी टेमकर मॅडम यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

       दिनांक 16 जुलैपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. जिल्हा परिषद शाळेच्या वतीने पहिल्याच दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जाणार आहे. यात लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचाही समावेश असणार आहे. सर्व जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेशोत्सव राबविण्यात येणार असून यंदा पहिल्यांदाच लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहभाग या उपक्रमाच्या माध्यमातून सुनिश्चित करण्यात आला आहे त्यामुळे शाळा प्रशासन,पालक व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समन्वय वाढण्यास मदत होणार आहे.

 या प्रवेशोत्सवात काय असेल विशेष ?

      या प्रवेशोत्सवामध्ये  इयत्ता पहिली मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येणार येईल.विद्यार्थ्यांचा प्रवेश झाल्यानंतर त्यांना पुस्तक व पेन्सिलचे वाटप करण्यात येईल.समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत विद्यार्थ्यांची उंची, वजन मोजणे व इतर प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात येईल.स्मरणशक्तीवर आधारित बुद्धीचे खेळ आयोजित केले जातील.प्रत्येक विद्यार्थ्यांच्या उजव्या हाताचा ठसा चार्ट पेपरवर उमटवून तो वर्गात लावण्यात येईल. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून स्मरण पत्रिका भरून घेतली जाईल.स्मरणपत्रिका 2035 साली उघडून त्या दिवसाचे स्मरण करण्याचा संदेश दिला जाईल. इयत्ता पहिलीतील प्रवेशित मुलांचे ग्रुप फोटो घेऊन व त्या फोटोची प्रत पहिलीतील प्रवेशित प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात येईल.

    शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सर्व सदस्य,पालक व गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.त्यामुळे नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे मनोबल नक्कीच वाढणार आहे.

रविवार, ८ जून, २०२५

हिमायतनगरात रेतीमाफियाराज पुन्हा एकदा बोकाळला

वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकारास वाळूमाफियाकडून मारहाण ; दोन्ही मोबाईल फोडून जीवे मारण्याचा प्रयत्न ?


हिमायनगर -  आष्टी येथील पत्रकार, मराठी डिजीटल पञकार संघाचे  तालुका उपाध्यक्ष गजानन जिद्देवार हे हिमायतनगर तालुक्यातील वीरसनी येथे अवैध वाळू साठा असल्याने ही माहिती हिमायतनगर चे तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सदर वाळूचा लिलाव शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास होणार होता. सदर वाळू गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांना वितरित होणार होती. त्याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी सदर बाबीचे वृत्त संकलन गजानन जिद्देवार करत असताना वाळू माफिया ने त्यांना जबर मारहाण करत दोन्ही मोबाईल फोडून अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असल्याची घटना शुक्रवारी वीरसणी ता.हिमायतनगर शिवारात घडली आहे.

    याबाबत गजानन जिद्देवार यांनी हिमायतनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत असे नमूद केले की मी दिनांक 6 जून 2025 रोजी शुक्रवारी अकरा वाजण्याच्या सुमारास हिमायतनगर तहसील मध्ये हिमायतनगर तहसील अंतर्गत रेती साठ्याची माहिती घेऊन व माहितीचा अधिकार देऊन विरसनी मार्ग हदगाव कडे जात असताना वीरसनी येथे गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात वाळू साठा होता.तो तहसीलने जप्त करून त्याचा लिलाव आज होणार होता.सदर बाबीचे माहिती जाणून घेण्यासाठी वृत्तांकन करण्यासाठी गजानन जिद्देवार गेले असता त्या ठिकाणी सात ते आठ ट्रॅक्टर होते.पोलीस पाटील, तलाठी, व इतर जनता मोठ्या प्रमाणात हजर होती. व तहसीलदार जाय मोक्यावर येणार म्हणून प्रतीक्षा करत होते. तेवढ्यात जिद्देवार हे वाळूच्या ढगाचे फोटो काढत असताना तिथे हजर असलेला वाळू माफिया तथा शिवसेना शिंदे गटाचा पदाधीकारी शेख अफरोज,यांनी जिद्देवार यांना येऊन तूच आमच्या तहसीलदार मॅडम कडे वाळूची तक्रार करणारा आहेस का ?  म्हणून बेदम मारहाण केली. तसेच सोनू देवसरकर व इतर अज्ञात आठ ते दहा जणांनी लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.व शेख अफरोज व सोनू देवसरकर यांनी अंगावर बसून गळ्यातील चाळीस हजार रुपयांची सोन्याची चैन, काढून घेतली भांडण्याच्या दरम्यान माझ्या खिशातील पाच हजार रुपये कुठे पडले की ?  तसेच मी चित्रीकरण केलेले माझे मोबाईल फोडले असल्याची तक्रार हिमायतनगर पोलीस स्टेशनला दिली. 

    दिलेल्या तक्रारीवरून हिमायतनगर पोलीस स्टेशनला यातील आरोपीविरुद्ध गु.रं.न 120/2025 कलम 119,(1) 118,(1) 115,(2) 351,(2)189,(2) 199,(2) 191,(2)   191,(3) 190 ,324,(4) 324(5) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी अद्याप ही फरार आहेत. 

    मराठी पत्रकार डिजिटल पत्रकार संघ हदगावचे उपाध्यक्ष गजानन जीदेवार  यांच्यावर भ्याड हल्ला करणारे आरोपीस तात्काळ अटक करण्यात यावी. व पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यास यावा. सदर घटनेचा निषेध नोंदवून मराठी डिजिटल पत्रकार संघाचे हदगाव तालुकाध्यक्ष मारुती काकडे ,महेंद्र धोंगडे व तसेच मराठी पत्रकार संघाचे वतीने पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे.

मा.आ.जवळगावकरांनी संधी दिल्यास सरसम जिल्हा परिषद गट काँग्रेस कडून लढवणार - सरपंच ॲड अतुल वानखेडे

 

वानखेडे यांनी सरसम जिल्हा परिषद गटावर दावा केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा 

नांदेड विशेष प्रतिनिधी - विजय वाठोरे 

हिमायतनगर  -  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचा निर्णय कोर्टाने दिल्यानंतर निवडणूक विभागाने आपआपल्या भागात निवडणूक प्रक्रिया जाहीर होणार म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या तालुक्यातील नेतेमंडळीनी आपआपल्या भागातील लग्न समारंभ ,अंत्यविधी व वास्तू कार्यक्रमास भेटीगाठी देण्यावर भर सुरू केल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर एका लग्न समारंभ प्रसंगी हदगाव हिमायतनगर विधानसभेचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे हिमायतनगर तालुक्यातील दोन्ही जिल्हा परिषद व पंचायत समिती गटावर एक हाती वर्चस्व असल्यामुळे काँग्रेस पक्षाकडून सरसम ग्रामपंचायतचे सरपंच तथा अभिवक्ता संघाचे तालुका अध्यक्ष ॲड अतुल वानखेडे यांनी काँग्रेस पक्षाकडून मला माजी आमदार  जवळगावकरांनी संधी दिल्यास सरसम जिल्हा परिषद गट लढवणार असल्याचे बोलून दाखवले.

    निवडणूक आयोगाने प्रस्तावित असलेल्या नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत नवीन जिल्हा परिषद गट किती होणार  ? लोकसंख्ये नुसार मतदारसंघाची रचना कशी करावी ह्या तयारी संदर्भात माहिती मागवली आहे. ईव्हीएम, बॅलेट, स्ट्राँग रूमच्या व्यवस्थे संबंधी सुद्धा निवडणूक विभागाने पत्राद्वारे विचारणा केली आहे.त्यामुळे हिमायतनगर मतदारसंघावर काँग्रेसचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे दोन्ही जिल्हा परिषद, 4 पंचायत समिती गटावर एक हाती वर्चस्व असल्यामुळे सरसम जिल्हा परिषद गटातून अभिवक्ता संघाचे अध्यक्ष तथा सरसम ग्रामपंचायतचे सरपंच ॲड अतुल वानखेडे यांनी नुकतेच एका लग्न समारंभ कार्यक्रम प्रसंगी माजी आमदार जवळगावकरांनी मला काँग्रेस पक्षाकडून सरसम जिल्हा परिषद गटाची निवडणूक लढवण्याची संधी दिल्यास मी पूर्ण ताकतीने ही निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

     दुसरीकडे शिवसेना-भाजप व उबाटाच्या सर्वच राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघातील लग्न समारंभ व अंत्यविधी वास्तु कार्यक्रमास भेटीगाठी देण्यावर मोठा भर देऊन कामाला लागले आहेत. राज्यातील  मोठ मोठे नेतेमंडळी वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन आपला प्रचार करताना दिसून येत आहेत तर काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत मात्र मोठे फेरबदल होताना दिसून येत आहे काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष निवडी मध्ये अग्रगण्य माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांचे नाव असल्यामुळे हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे सध्या पहायला मिळत आहे  तर कुठे आरोप तर कुठे प्रत्यारोप सुद्धा सुरू असल्यामुळे काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराची रंगत वाढणार हे मात्र  नक्की पहायला मिळणार आहे. त्यामुळे सरसम जिल्हा परिषद गटावर अतुल वानखेडे यांनी दावा केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होताना दिसून येत आहे.

सरसम जिल्हा परिषद गटाला मिळणार नव्या दमाचे नवे उच्चविद्याविभूषित नेतृत्व ?

सरसम जिल्हा परिषद गटामध्ये ऍड. अतुल वानखेडे यांचे नाव सर्वपरिचित असून हिमायतनगर तालुक्यासह नांदेड व संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या कामाची पद्धत आणि जनसामान्यांची सेवा करण्याची वृत्ती यामुळे ते जास्त ओळखले जातात.त्यांच्या नेतृत्वात सरसम बु गावातील गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नव्याने पॅनल उभारून 11 पैकी 8 ग्रामपंचायत सदस्य त्यांनी निवडून आणले होते.तसेच त्यांचा असलेला दांडगा जनसंपर्क यामुळे त्यांना कोणतेही कार्य पूर्णत्वास जाण्यास अडथळे उभे राहत नाहीत. तसेच ऍड. अतुल वानखेडे हे एक कसलेले नामांकित वकील असून ते उच्च विदयाविभूषित व्यक्तिमत्व आहेत. यामुळे सरसम जिल्हा परिषद गटाला या वेळेस नव्या दमाचे नवे नेतृत्व लाभणार आहे. यामुळे नक्कीच या गटाचा विकास जोमात होणार यात शंका नाही. मा. आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी वानखेडे यांना सरसम जिल्हा परिषद गटातून लढण्याची संधी दिल्यास ते या संधीचे सोने करून दाखवतील यात दुमत नाही.माजी. आमदार जवळगावकर या बाबीकडे कोणत्या दृष्टीने बघतील यावर आता सरसम जिल्हा परिषद गटाचे विकासात्मक  भवितव्य अवलंबून आहे.

जेष्ठ नागरिक संभाजीराव शिंदे पळसपुरकर यांचे निधन

१०५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास   महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज नेटवर्क  मुख्य संपादक - विजय वाठोरे सरसमकर  संपादक - लंकेश वाठोरे सरसमकर  ह...